नेहा माझ्याकडे समुपदेशनासाठी आली तेंव्हा खूपच बावचळलेली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. शब्दांमध्ये खूप भिती जाणवत होती. तिच्या सांगण्यानुसार तिचे कॉलेजमध्ये असलेल्या मुलाबरोबर प्रेमाचे नाते होते. पण तो तिला सतत डॉमिनेट करत असे. हिने काय वागावे आणि काय नाही, हे तोच ठरवत असे. सुरवातीच्या काळात तिने स्वतःला खूप बदलत राहिली. पण नंतर तिला ते अवघड जाऊ लागले. ती असेही म्हणाली, माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे, आणि मला त्याला हरवायचे नाही म्हणून मी स्वतःला बदलायला तयार आहे. पण कधी कधी मला त्याची भीती वाटते. आणि मी जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाही तर तो मला सोडून तर देणार नाही ना?
नेहाच्या आयुष्यात आहे अगदी अशीच परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असते असे नाही. पण आपले नाते पुढे नेणे गरजेचे आहे, आणि मग त्यासाठी आपण या नाही, त्या तऱ्हेने स्वतःची समजूत घालतो.
मुळात आपण नाती का निर्माण करतो? आपल्या आयुष्यात प्रत्येक स्तरावर अनेक नाती असतात. नातं कोणतेही असो ते निर्माण होण्यामागचं सगळ्यात महत्वाचा पैलू असतो, तो म्हणजे त्यामागचा उद्देश. आपण आयुष्य जगत असताना आपल्या अनेक गरजा असतात – मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक…. या सगळ्या आपल्या गरजा आपण एकटे पूर्ण करू शकत नाही. आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी आपण कोणाचा तरी शोध घेतो. या गरजा जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत नाते हवे हवेसे वाटते, पण ज्या क्षणी गरजा पूर्ण होणे अवघड होते, ते नाते नकोसे वाटू लागते. आणि मग सगळंच अवघड होऊन बसते. याचा परिणाम निश्चितच आयुष्यातल्या बाकी अंगावर होऊ लागतो.
खरं तर आपण कोणतेही नाते निर्माण करताना, त्या नात्याचं हवेपण आपल्याला हवं असेल तर, कोणतंही नातं तुमची गरज बनवू नका. निश्चितच तुमच्या गरजा आहेत तशाच आहेत, पण त्या त्याच ठिकाणी आणि आपल्याला हव्या त्याच पद्धतीने पूर्ण व्हाव्यात या मुद्द्यावर तुम्ही येता तेंव्हा ते नातं तुमची गरज बनते. आणि नातं गरज झालं कि विचार आणि वर्तन दोन्ही ताठर होतात. आणि मग त्या नात्यातला सह्जपणाचं निघून जातो. नातं जपताना, त्याला तुमची इच्छा बनवा, गरज नको.
पण हे करण्यासाठी इच्छा आणि गरज यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. कठीण परिस्थितीत एखाद्या माणसाची गरज वाटण स्वाभाविक आहे, पण सतत त्याची गरज जाणवून देणं, नात्यात घुसमट निर्माण करत. जेंव्हा तुम्हाला एखाद्याची गरज आहे ,त्याचा दुसरा अर्थ तुम्ही स्वतःच अस्तित्व, स्वातंत्र्य पूर्णपणे हरवलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्या माणसावर अवलंबून राहत आहात. तुम्ही स्वतःचे विचार, जीवनशैली हरवून बसलेले आहात. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा एकटेपणाने तुम्ही करू शकत नाही. हे कोणी मुद्दाम करत नाही. नात्याच्या सुरवातीला सहवासाच्या हव्यासापोटी आणि आपले प्रेम चुकीच्या पद्धतीने व्यक्त केल्याने पुढे हे घडते. आपण छोटी छोटी गोष्ट एकमेकांना विचारून करतो, परवानग्या घेतो, आणि मग नंतर या गोष्टी त्रासदायक ठरतात. आणि कोणालाही आपल्यावर सतत, प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून असणारा माणूस आवडत नाही.
दुसऱ्या हाताला, एखाद्या नात्याची केवळ इच्छा, हे प्रेमाचे मूळ आहे. मूळ मजबूत असतील तर झाड जगेल.कोणी तुमच्या आयुष्यात असण्याची तुम्हाला इच्छा असते कारण त्या माणसाच्या असण्याने तुम्हाला आनंद वाटतो, चेहऱ्यावर हसू येत. तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी स्वतः करूच शकता, फक्त ते माणूस तुम्हाला बरोबर हवं असत. ते तुमची गरज नसतात, तर ते असल्याने तुम्हाला तुमचं आयुष्य हलकं फुलकं आणि आनंदी वाटत. तुम्ही १००% एकटे उभे राहणाऱ्यांमधले असता, ते माणूस तुम्हाला कुबडी म्हणून नको असतं.
आणि जेंव्हा नात्यात कोणी असण्याची फक्त इच्छा असते तेंव्हा दोघांसाठीही सगळ्याच गोष्टी खूप सहज न सरळ होतात. आणि ज्यामुळे नाते संबंधहि खूप सुंदर राहतात.
संवांद…. तुझ्या माझ्या शरीराचा….
मनीषा माझ्याकडे आली. दिसायला अत्यंत लोभस, देखणी. म्हणाली, खूपच खाजगी गोष्ट आहे. कशी सांगू कळत नाहीये. पण आता त्याचा खूपच त्रास होतोय. माझ्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत. संसार अगदीच छान चालू आहे. बाहेरून कोणी पाहिलं तर नजर नको लागायला अस नेहमी माझी आई म्हणते. पण जेंव्हा मी आणि आदित्य म्हणजे माझा नवरा बेडरूम च्या आत असतो त्याबद्दल मी कोणाला सांगणार. गेले ३ वर्ष आमच्यात असणारे शारीरिक संबंध आमच्या नात्यात खरंच संबंध जोडतायत का? हा मला प्रश्नच पडतो उबग आल्यासारखं झालय मला. मला जे हवंय ते त्याला कळतच नाहीये. माझं शरीर त्याला माझ्याकडे खेचत का? मी नाही का? मी त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला मला काय हवंय. पण…. बहुतेकवेळा त्याला हवं तसंच. मी काय उपभोगाची वस्तू आहे का?
असे अनेक आवाज आतल्या आत कुढत असतात. मंडळी समागम हे फक्त शारीरिक गरज म्हणून पाहावं का? निश्चितच त्याच मूळ कार्य प्रजनन हेच आहे. पण त्यात तुमच्या भावनांची गुंतवणूकही असते. काही जणांसाठी ती फक्त शरीराची भूक असते. काहीजणांसाठी ती भावनांची देवाणघेवाण असते.
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही एकमेकांकडून समागमाबद्दल असणाऱ्या अपेक्षा नेहमीच वेगळ्या असतात. याला दोघांच्या शरीरात असणारे भिन्न हार्मोन्स हे एक महत्वाचे कारण आहे. स्त्री साठी संभोग हि प्रेमाची अत्युच्च पातळी आहे. आणि पुरुषासाठी तो शारीरिक संबंध आहे. पुरुषाला प्रेम शारीरिक संबंधातून व्यक्त करायला आवडते. आणि स्त्रीला हळुवारपणा हवा असतो, त्याने तिला प्रेमाने जवळ घ्यावं, खूप वेळ गप्पा माराव्यात, बोलण्यातून प्रेम व्यक्त करावं… समागमापूर्वी आणि नंतरही…..अस काहीस. मुळात दोघांमध्ये असणारा एवढा मोठा फरक कारण पुरुषाची उत्तेजनाची पातळी हि खूप जास्त असते.
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही भिन्न हार्मोन्स मुळे शारीरिक आणि भावनिक अपेक्षांमध्ये फरक जरी असला तरी या दोन्हीच्या मदतीने नात्याचा मेळ साधायचा असेल तर पुढील काही गोष्टी लक्षात घेऊयात.
मुळात नवरा बायको हे असे एकमेव नाते आहे, जिथे तुमचे रक्ताचे नाते नसूनही तिथे घट्ट संबंध जोडले जातात. आणि त्यात शारीरिक संबंध मोठी भूमिका बजावतात. शारीरिक संबंध ठेवताना आपण फक्त नवरा बायको आहोत म्हणून हा संबंध आपण ठेवत नाहीये ना हे पाहावं. कारण त्या संबंधातून,फक्त मला काय हवे आहे याकडे एकाचाही कल असेल तर तो चक्क बलात्कारिय संभोग असेल. मुळात यासाठी समर्पणाची भावना असेल तर तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकाल. यात सगळ्यात पहिली महत्वाची भावना संभोगासाठी मी माझ्या जोडीदाराची पहिली पसंती आहे. संभोगाकडे जाण्यापूर्वी आपल्या जोडीदादाराला पूर्णपणे स्वीकारा. कारण इथे शारीरिक संबंध जरी असला तरी त्याबरोबरच तो मानसिकही आहे. आनंद हि सकारात्मक भावनांमधील सर्वोच्च भावना आहे.संभोगातून आनंद देता घेता येणं हि नात्यातली उच्च पातळी आहे. ते घडल्यास नात्यात समाधान मिळण्यास मदत होते. जेंव्हा संभोगाच्या मदतीने तुम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकता, व दुसऱ्याला समजून घ्यायला शिकता, तुमची माणूस म्हणून निश्चितच उन्नती होऊ लागते. नात्यातील मानसिक संबंध दृढ होतात.
तुमच्या शारीरिक संबंधातून नात्याची मानसिकता आकार घेते. आणि ती तुमच्या कौटुंबिक, सामाजिक पातळीवर परावर्तित होत असते. आपल्या संस्कृतीत आपण जरी शारीरिक संबंधाबद्दल मुलांशी मोकळेपणाने चर्चा करत नसलो, तरी एका ठराविक वयानंतर आई वडिलांच्या नाते संबंधावरून, त्यांच्यात असलेल्या शारिरीरिक आणि मानसिक नात्याबद्दलचे तर्क वितर्क मुलं लावतात. आणि त्यावर आधारित स्वतःच्या आयुष्यातले निर्णय ती घेऊ लागतात. नात्यातल्या सगळ्याच पैलूंबद्दल. तुमच्या एकंदरीतच संबंधातून नात्यांकडे पाहायचा दृष्टीकोन तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देत असता. आणि हेच तर आपण त्यांना द्यायचं असत.
संवाद तुझ्या माझ्या शरीराचा – भाग २
तेजस्विनी माझ्याकडे आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तिच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली होती. तिला छान २ मुलं होती. तिचा नवरा मनोज उत्तम पदावर नोकरी करत होता. चांगला पगार. एकंदरीत सुखवस्तू आयुष्य जगत होते. सर्व तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. तरी ती आनंदी नव्हती. कारण तिच्यात आणि मनोजमध्ये अनेकदा भांडण व्हायची. भांडणाचे कारण एकच होते. मनोजला अनेकदा तिच्याबरोबर शारीरिक असण्याची इच्छा व्हायची, आणि हिला ती आजिबात नसायची. मग वाद, रडणं, चिडणं यात बऱ्याच रात्री जात होत्या. आणि त्याचा दुसऱ्या दिवसाच्या कामावर, बोलण्यावर परिणाम निश्चितपणे व्हायचा.
तेजस्विनी मला म्हणाली मला मनोज आजही तितकाच आवडतो, माझं त्याच्यावर प्रेमही आहे पण इच्छाच होतं नाही. आणि तो माझ्या शरीराकडे जास्त आकर्षित होतो याचा मला खूप त्रास होतो. त्याला आमच्या मनापेक्षा शरीराचा संवाद नेहमीच जास्त हवा असतो. काय करू मी? कसं सांभाळून नेऊ हे सगळं पुढे?
मंडळी साधारणतः आपल्याकडे जेंव्हा एखादी स्त्री या पद्धतीने तिची बाजू मांडते, त्यावेळेस आपले झुकते माप हे स्त्रियांसाठीच असते. कदाचित आपली संस्कृती आणि त्यामुळे आपली तयार झालेली मानसिकता त्याला कारणीभूत असेल. स्त्रीला दुर्बल समजतात, त्यांच्यावर पुरुष नेहमीच सत्ता गाजवतात आणि त्यात सोशल मिडिया यामुळे स्त्रियांच्या बाजू समजून घेताना त्यांचं पारडं आपोआप जड होतंच.
आपल्याला खूपदा हे कळत नाही, पुरुषाची शारीरिक संबंधासाठी इतकी ओढ का? पण या सगळ्याकडे पुरुष्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पहिले पाहिजे. बहुतेकवेळा ते समजून घेणे कठीणच. कारण मुळात संसारात जेंव्हा सगळे काही ठीक चालू असते आणि स्त्री तिच्या अनेक वेगळ्या भूमिकांमध्ये गुंतून जाते, तेंव्हा ती शारीरिक संबंधाला प्राधान्य देत नाही. कारण बोलण्यातून व्यक्त केलेले प्रेम देखील तिला पुरेसे वाटते. पण पुरुष्याच्या बाबतीत तसे घडत नाही. ते बहुतेकवेळा शब्दातून प्रेम व्यक्त करत नाहीत किंवा अनेक पुरुषांकडे ते कौशल्य नसते. शारीरिक संबंधाच्या माध्यमातून ते स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर जेंव्हा ते आपल्या जोडीदाराबरोबर समागम साधतात तेंव्हा त्यातली जवळीकता, हालचाली, भाव या सगळ्यातून दोघांमध्ये असणारा आपलेपणा त्यांच्याकडून पहिला जात असतो. माझ्या काही पुरुष क्लायंट बरोबर च्या चर्चेत, मला असे निदर्शनास आले शारीरिक संबंधातून ते नात्यात एकसंधपणा आणण्याचा प्रयत्न करत असतात.
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पुरुष जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध किती वेळा ठेवता आणि कशा प्रकारे ठेवता याचा त्यांच्या आत्मविश्वास आणि आत्म सम्मान या दोन्हीवर थेट परिणाम होत असतो. आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात नेहमीच आपले व आपल्या नात्याचे स्थान पहिले आहे हि भावना त्यांच्या सकारात्मक अहंचे पोषण करते. आणि तिथे तुमच्या नात्याच्या संबंधाला आकार येतो. आपण आपल्या स्त्री जोडीदाराला सेक्स मध्ये खुश ठेऊ शकतो ना यावर त्याचा आत्मविश्वास अवलंबून असतो. त्यामुळे समागमामध्ये अथवा समागम नंतर तुम्ही त्याला कशी दाद देता हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे असते. जर ती दाद योग्य प्रकारे व्यक्त झाली नाही तर ते स्वतःवरच नाखूष होतात आणि स्वतःला असहाय्य, दुर्बल समजू लागतात. जेंव्हा तुम्ही सतत शारीरिक संबधावरून काही तक्रारी करत राहता त्या गोष्टी ते व्यक्तिगत पातळीवर घेतात, यातून कितीतरी वेळा त्यांना वैमनस्य देखील येते.
कित्तेक वेळा भांडण झाल्यावर जेंव्हा तुमचे तुमच्या पुरुष जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध येतात, गोष्टी परत नेहमीनुसार चालू होतात… असे का… कारण त्या प्रत्येक शारीरिक हालचालीतून तो हे पाहतो कि तुम्ही त्याच्याशी जोडलेले (वेल कनेक्टेड) आहात. जेंव्हा तुम्ही सेक्स आणि तुमचे नाते या गोष्टीला प्राधान्य देता तेंव्हा तो देखील तुमच्याशी तितकाच जबाबदारीने आणि बांधिलकीने वागतो, कारण मला माझ्या जोडीदाराबद्दल ज्या भावना आहेत त्याच तिला देखील आहेत याबद्दल त्याला विश्वास निर्माण होतो. पुरुष जोडीदाराच्या मते शारीरिक संबंध यापेक्षा आम्ही जोडी म्हणून घट्टपणे जोडले गेले आहोत हि भावना त्याच्याकडून जोपासली जात असते.
प्रत्येक स्त्रीला तिचा पुरुष जोडीदार कर्तृत्वान आणि पूर्ण असणं जास्त आवडते. पण तुम्ही त्याला साथ कशी देता यावर ते अवलंबून आहे. आणि त्याची मानसिकता तुम्ही त्याच्या बरोबर शारीरिक संबंध कसे ठेवता यावर अधिक अवलंबून आहे.