काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक लग्न झालेलं जोडपं समुपदेशनासाठी आलं होतं. त्या दोघांमध्ये खूप वाद होतं होते. कारण होतं मुलं होऊ द्यावं का? आणि कधी? या मुद्द्यावर चर्चा करताना त्यांचं म्हणणं होतं, एक मुलं जन्माला घालणं आणि वाढवणं खरंच सहज आणि सुरक्षित आहे का? आज एका विषाणूमुळे मुळे पूर्ण जग हलून गेलंय, आजची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरची एकंदरीत परिस्थिती पाहता कशावरून हे असं परत – परत घडणार नाही?
मंडळी त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाल्यानंतर मीदेखील थोडी अस्वस्थ झाले आतून… यांच्यासारखी अजुन काही मंडळी मनातून अस्वस्थ झाली असतील का?… काल भाजी आणायला गेले ४० रुपये पावशेर होती भाजी. हि वाढती महागाई, निसर्गाचं नियमित असं चक्र नाहीये. खरंच यापुढील आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सगळंच अनिश्चित असेल का? असं मलाही वाटलं. पण अहो अनिश्चितता आयुष्यात निश्चित असतेच खरं तर… मग जगतोय तोपर्यंत आत्मविश्वासाने, आनंदाने आणि मनात रोज भीती न बाळगता आपण जगणं ते खरं जगणं अहो…. कुठेतरी वाचण्यात आलं होतं, ‘मृत्यू एकदाच होतो पण आयुष्य रोज मिळत’. सद्गुरू (जग्गी वासुदेव) म्हणतात, ‘घडाळ्यातली टिकटिक म्हणजे फक्त वेळ पुढे सरकत नसते, तर त्याबरोबर आयुष्य पुढे सरकत असत मग तो प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगावा’. यासाठीच काही मुद्दे आले डोक्यात –
मंडळी मन आणि बुद्धी हि जणू स्वर्गातून बांधून पाठवलेली जोडी आहे. मग त्या दोन्हीची काळजी घेणं आपलंच कर्तव्य ना हो. पण आत्तापर्यंत आपण बहुतेकजणआपल्या आरोग्यकडे दुर्लक्षित करत आलोय. आणि त्यातून मानसिक आरोग्याची जी काही आबाळ झालीये त्याबद्द्दल काही नाही बोलावं हे उत्तम. मंडळी आपल्याला वाटत आपण आनंदी असलो कि आपला चेहरा हसरा होतो, पण काही रिसर्च असंही सांगतात कि आपण जबरदस्तीच हसू जरी चेहऱ्यावर ठेवलं तरी आपला मूड छान होतो. आणि जेवढे आपण प्रसन्न तेवढ्या छान पद्धतीने आपला मेंदू आणि शरीर कार्य करत. म्हणूनच कदाचित संत तुकाराम गाथेमधे म्हणत असतील ‘मन करा रे प्रसन्न l सर्व सिद्धिंचे कारणll’ असही परवा माझ्या वाचण्यात आलं आपण हसल्यावर आपल्या चेहऱ्यावरील काही मसल्सची हालचाल होते आणि त्यामुळे काही नयूरॉन्स सक्रिय होतात आणि सकारत्मक कामे घडवून आणतात. म्हणे आजकाल लोक हसणं इतकं विसरलेत की चेहऱ्यावरच्या त्या मसल्स ची हालचाल व्हावी याकरता तोंडात पेन्सिल आडवी धरायला सांगतात. तुम्ही बुद्धांची मूर्ती पहा किंचित हासलेली अशी मुद्रा असते. तुमचा विश्वास बसणार नाही पण कारण नसतानाही तुम्ही जर अशी मुद्रा करून दहा मिनिटें जरी बसलात तरी रिलॅक्स वाटत.इतक्या छोट्याशा गोष्टीपासून आपण मानसिक आरोग्याची काळजी घेणे सुरु करू शकतो. शेवटी शरीर मनावर आणि मन शरीरावर अवलंबून आहे हे आपण लक्षात ठेवलेच पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपण जर आरोग्याने धडधाकट असलो तर आपली दोन पालकत्व निभावणं सहज शक्य आहे. आपण जन्माला घातलेली मुलं आणि आपले आई-वडील…. हो हि भूमिका कालांतराने आपोआप बदलतोच कि हो…. मुळात रोजचा दिवस जगा. त्या प्रत्येक क्षणासाठी नैसर्गिक अलौकिक शक्तीचे आणि त्या प्रत्येकाचे मनापासून आभार माना ज्यांच्यामुळे तुम्ही श्वास घेताय. आणि त्यासाठी चेहऱ्यावर एक हलकीशी का होईना स्माईल येऊ द्या. आणि सांगा काय अवघड आहे तुमच्यासाठी.
जेंव्हा आपण सगळेजण निसर्गाचा एक भाग आहे, तर त्याला धरून आपण का जगत नाही. साधं उदाहरण पहा पक्षी प्राणी आपल्या बाळांसाठी खूप काही साठवत बसतात का? त्यांची पिल्लं सबळ होईपर्यंत त्यांच्या खाण्या – पिण्याची त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ते सहज पार पाडतात ती म्हणजे स्वतःच्या पिल्लांना सक्षम बनवणं. एकदा त्यांची पिल्लं स्वतंत्रपणे जगू शकतील असा त्यांना ज्या दिवशी वाटत तेंव्हा त्याला ते निसर्गचक्रात सोडून आपल्या वाटेने पुढे जातात.आणि हेच नेमकं आपण विसरतो. मुलांवर प्रेम म्हणजे त्यांना महागड्या गोष्टी आणून देणं यातच खूप पालक अडकलेत. सुट्टी दिवशी मॉल आणि हॉटेल…. आणि त्यांच्या भविष्यासाठी खूप पैसे साठवण… पण या सगळ्यात मुलांना आपण जगणं शिकवायचं राहून जातंय का हो मंडळी? शेअरिंग मध्ये आनंद आहे, आपल्या भोवताली असणाऱ्या सर्वांना स्माईल देण्यात आनंद आहे, अगदीच काय सकाळी उठल्यावर स्वतःलाच एक सुंदर स्मितहास्य देण्यात केवढातरी आनंद आहे, हे मुलांना आपण शिकवतो का? अर्थात हे आपणच करत नाही तर त्यांना कस शिकवणार? मंडळी जेंव्हा माणूस मानसिकरीत्या मजबूत असतो ना तेंव्हा तो आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतून सहज पुढे जाऊ शकतो. मग आपण आपल्या मुलांना सकारात्मक भावना अंगी कशा बाणवाव्यात हे का नाही शिकवत. हेच आपण त्यांच्यासाठी उभं केलेलं मोठं भांडवल असेल अहो.आणि मुलांची खुपंच काळजी असेल तर तुम्हीही हेच जागा कि…
आपल्यातल्या खूप जणांनी राजेश खन्नाचा आनंद पहिलाच असेल, मृत्यू समोर असून सुद्धा आनंदाने आणि आनंद देत जगत होताच कि आनंद. आपणही तितक्याच आनंदाने रोज जगूच शकतो. तुम्ही म्हणाल हे आयडियल आहे. पण मंडळी खरं सांगू का मुळात आयडियल काहीच नसत हे उमगणे गरजेचं असत. आणि याची आयडिया आली कि कोणीच थांबवू शकत नाही आपल्याला. तसही या महामारीने आपले ज्यांच्याशी मनापासून लागेबांधे आहेत त्याच्या सुंदर अस्तित्वाची जाणीव आपल्याला करून दिलीच आहे. कदाचित निसर्ग असं नाही तसं आपलं मूळ काय आहे याची जाणीव करून देतोय. मंडळी निसर्ग खूप मोठी शक्ती आहे, ती तसंही नेहमीच आपल्याला खूप शिकवते ते लक्षात घेतलंच पाहिजे, मुलांना आपलं निसर्गाशी नातं कस जोडलेलं हे शिकवा. त्यांना निसर्ग अनुभवू द्या. खळखळ पाणी पुस्तकातच नको, पावसाचं पाणी अंगावर घेऊ द्या. मुलं निसर्गाशी जेवढी जोडली जातील तेवढं ते आपोआप शिकणार. अहो आपणदेखील निसर्गाचं अनुकरण केलं तर आयुष्य खूप आनंदी असणार आहे. आणि मुलांना हेच दिल पाहिजे आपण.
राहता राहिला विषय मुलं जन्माला घालणं. बाळाचा जन्म हि नैसर्गिक क्रिया आहे. बाळाला जन्म देण्याचं वरदान मिळालंय आपल्याला. आणि निसर्ग म्हणजे निर्मिती, अगदी प्रकृती आणि पुरुष एकत्र आले, का? तर निर्मितीसाठीच ना… आयुष्य, जग याच्या संतुलनाची काळजी आपण मुलं जन्माला घालताना का करावी? निसर्ग नावाचा बाप आहेच कि त्यासाठी. आता हेच पहा कोरोना हा विषाणू भले मानवनिर्मित जरी असला तरी तो निसर्गाचाच भाग आहे. जणू आपला बाप आपला कान धरून सांगतोय आता तरी बदल… आणि अहो मंडळी आपण म्हातारे झाल्यावर आपली काळजी घ्यायला कोणी हवंच कि….
मंडळी आपण एक लक्षात घेतलंच पाहिजे – निसर्गलाही सांभाळणारी एक ताकद आहे, ती ताकद निसर्गला आपण सोडलेला उच्छवास घेऊन आपल्यासाठी नवीन श्वास तयार करायला लावते. स्वतःला त्या ताकदीशी जोडण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी आंतरिक ताकद अनुभवणं खूप गरजेचं आहे.वरवरच्या मजेपेक्षा आंतरिक शक्ती कशी वाढेल याकडे लक्ष द्या.तुमच्या मनाची शक्ती आणि सकारत्मक ऊर्जा खच्चून भरा आणि मग बघा मजा येते कि नाही आयुष्य जगायला.