योगायोगाने एका पूर्व प्राथमिक शाळेच्या बाहेर उभी होते… नुकत्याच शाळा चालू झाल्यात… आत जाताना मुलांची रडारड चालू होती… जी अगदी स्वाभाविक… पालक सुद्धा बावरलेले… काही आयांच्या चेहऱ्यावरचे भाव तर असे होते, कधी माझं कोकरू त्या टीचरच्या हातून सुटून माझ्या छातीला येऊन बिलगतय…
सगळं खरं आणि अपेक्षित जरी असलं तरी मूल शाळेत जाताना आपण त्याला काय सांगतोय हे खूप महत्वाचे… त्याचप्रमाणे ते लवकर स्थिर – स्थावर व्हावं यासाठी आधी त्याला एकाच एक व्यक्तीची सवय ठेऊ नये… मुळात मूल शाळेत जातं कशासाठी… तर खूप गोष्टी नवीन पाहणं… अगदी माणसापासून ते वेगवेगळया गोष्टी हाताळण, नवीन विषय इथपर्यंत… आणि अहो मग यातून शिकणं होतं असतं… निश्चितच हे शिक्षण मार्कांसाठी नाही तर आयुष्य जगण्यासाठी… पण इथे तर तीन वर्षाच्या मुलाचे पालक त्याला म्हणतात ‘आता माझा बाबू शाळेत जाणार, भरपूर शिकणार आणि खूप मोठा होणार’… जिथे त्या बाबूला ‘अभ्यास’ ही टर्म सुद्धा माहीत नसते…
शाळेतून आल्यावर आज कोणते पोएम शिकवली, टीचरनी काय शिकवलं, त्या मिळणाऱ्या स्टारचं अवडंबर… आधी त्यांना हे विचारा कोण नवीन मित्र-मैत्रिणी भेटले, कोणते टॉय खेळले, टीचरशी गप्पा मारल्या का, किती छान आहेत ना त्या… त्यांच्या वयोगटला भावतील आणि आवडतील अशा विषयांवर गप्पा मारा…
मंडळी कसं आहे ना कोणताही नवीन विषय, नातं आयुष्यात सुरू होत ना त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्याची आवड निर्माण होण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतात… आणि मग गोडी निर्माण होते…सध्या वारी निघालीये, त्यांच्यात कुठून आणि कधी गोडी निर्माण होते हो त्या विठ्ठलाची… त्यांच्या कानी कपाळी कोणी ओरडत का तू देवाचं नाव घे, वारीला जा, आपोआप पाय वळतात त्यांचे, शाळा आणि शिक्षण तसंच आहे हो… आपोआप ही चिमुकली पावलं कशी शाळा नावाच्या पंढरीकडे वळतील याकडे लक्ष राहू द्या फक्त…
काही गोष्टी त्यांना आवडणार आहेत, काही जमणार नाहीयेत, काही चुकणार आहेत, सगळं स्वीकारा… फक्त त्यांचं जे काही चालू आहे ते सगळं ते एन्जॉय करतायत ना हे महत्वाचे… थोडक्यात आधीच्या पिढीतल्या आई – वडिलांनी जे केलं ते… त्यातले किती जण शाळेच्या पहिला दिवस म्हणून सोडायला आले… आणि इतका गरजेचा नसलेला विचार खोलवर जाऊन त्यांनी नक्कीच केला नाही… त्याला कारणं अनंत होती, पण मुलं घडली की… नॅचरल फ्लो राहू द्या, तो खूप महत्वाचा… वाहणारी नदी आणि कॅनॉल दोन्हीतून पाणी वाहत पण त्यातील सर्वांगाने असणारा फरक लक्षात येतोच आपल्या… तसंच काहीसं घडत इथेसुद्धा… तेवढंच लक्ष असू द्या…आणि मग बघा हो मुलं त्यांचं असं स्वतंत्र जग निर्माण करतील… ते व्हायला सुरुवात होईल…