हरवून जाणं… हो, तिचं त्याच्यामध्ये हरवून जाणं… किंवा आईचं बाळामध्ये हरवून जाणं… चांदण्या पहात हरवून जाणं… आणि एखाद्याने स्वप्नात हरवणं… स्वप्नासाठी हरवणं… हरवणं म्हणजे स्वतःला हरवून बसणं… त्याग, समर्पण यातूनच जन्माला आलं असेल का…
पण या हरवण्याची सुरवातीला एक अनामिक भीती असते, हुरहूर असते… कारण अशा हरवण्यातून मागे फिरण्याचा जणू रस्ताच नसतो… हरवणं म्हणजे एक अस्तित्व संपणं, याची कल्पना असूनही ते स्वीकारता येणं… केवढी ताकद लागत असेल त्यासाठी… डोंगर दऱ्यातून स्वतःच्या धुंदीत येणारी अवखळ नदी एका टप्प्याला विशाल समुद्राला पुढे पहाते… एका अर्थी तिचं अस्तित्व कायमचं संपणार असतं… पण तिला माहीत असतं, आता समुद्राच्या त्या प्रत्येक कणात आपण असू शकणार आहोत… हरवण्यासाठी सीमा असूच शकत नाहीत… इथेच एकरूपतेला सुरवात होत असेल का हो… हेच घडलं असेल का संत तुकारामांच्या बाबतीत… आणि मग या हृदयीचे त्या हृदयी घडतेच…
जगाच्या पाठीवर कुठेही असा, त्याच्या हृदयाचा ठोका आईला कळतो आणि तिलाही… त्याला त्याची जाण असो वा नसो… पण यांचा हरवण्याचा प्रवास थांबत नाही… कारण वर दिसणारा समुद्र आणि त्याचा सुंदर तळ यामधला फरक हरवणार्यांनाच माहीत असतो… जणू हरवणार्याला परत यायचंच नसत… यासाठी कोणती गरज किंवा इच्छा असावी लागत नाही… ते फक्त हरवणं असतं… स्वतःला स्वतःबरोबर… सगळ्या संवेदनाच्या पलीकडची भावना असते ती… कदाचित अगदी प्रेमाच्याही… अशा वेळेस आकाश कवेत घेणं सहज जमत हरवणार्यांना… हरवताना आपला आवाका काय आणि ज्यात हरवतोय त्याचा काय, यामुळे खरंच फरक पडत नाही… कारण तिथे सामावून घेणं घडत, त्याला थोडी मर्यादा असतात?… त्यामुळेच छोट्यातल्या छोट्या पक्षाला उडण जमत असेल… यत्र – तत्र पसरलेला वायू त्याला आपल्या इवल्याशा पंखात सामावून घेत उडत राहणं आणि जगणं… कारण ते हरवणं असतं…पण हरवणं आणि विस्कटणं यात नक्कीच फरक असतो… विस्कटणं म्हणजे संपण, हरवणं म्हणजे आनंद, जणू एक नवा जन्म…
एकदा एक भुंगा एका फुलावर खूप वेळासाठी बसून राहिला होता… संध्याकाळ झाली, फुल आता मिटणार आणि भुंगा आतच अडकणार हे दिसत होतं… त्या भुंग्याला कोणीतरी म्हटलं अरे तू इथेच बसलास तर तुझं आयुष्य संपलं… भुंगा म्हणाला, ‘मान्य आहे, पण आता याच सुगंधात अंत व्हावा असं वाटतंय’… हेच ते हरवणं… आणि मग समर्पण… एकरूप होणं… अनुभवून पहा… याच हरवण्यातून खूप काही गवसेल तुम्हाला मंडळी… हो, खरंच हरवण्यातून गवसतं…