मंडळी अलीकडच्या आमच्या पिढीच्या गरजा एवढ्या वाढल्यात किंवा आम्ही त्या वाढवल्यात त्यामुळे जे काही सण आम्ही साजरे करतो त्यात औपचारिकता म्हणा किंवा बुजलेपणाच जास्त असतो …
परवा वटपौर्णिमा होती, माझ्या खूप मैत्रिणी म्हणाल्या हॅ sss आम्ही नाही असलं करत काही… कोणाला हवा आहे हा नवरा सात जन्म… तो कुठे करतो आमच्यासाठी काही… आणि असं बरंच काय काय…
मंडळी हे आणि असे सण जे पूर्वापार चालत आलेत त्याला काही अर्थ असेलच ना… म्हणजे आहेच… शरीर आणि मनाचं संतुलन ते विश्व कल्याण पर्यंतचा विचार या सगळ्या मागे आहे… मग तो पुरुष असो वा स्त्री, वैयक्तीक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, चार नाती गोती, समाज या सगळ्याचं सुख, समाधान, आनंद यात दडलेलं आहे…
मग आपली स्वतःची मुलगी वा मुलगा यांना आपण हे द्यायला का कमी पडतोय… अहो सण म्हटल्यावर छान साडी घालून नटलेली आई आणि त्यामुळे त्यांना मिळणारा आनंद त्यापासूनदेखील आपण त्यांना वंचित ठेवतो… अर्थात हे स्वाभाविक आहे कारण या पिढीचा मॉडर्न पणाखाली अशा विषयांचा पूर्ण किंवा विशेष अभ्यास नसतो… प्रत्येक सणामागे शारीरिक, मानसिक, शास्त्रीय आणि आध्यत्मिक कोणते आणि काय विचार झालेत हे आपल्यालाच माहीत नसेल तर आपण मुलांना काय सांगणार… कदाचित त्यामुळेच आपले आज्जी-आजोबा करायचे त्या पद्धतीने आपण सण साजरे केले तर काय गावठी आहेत, किंवा बरा वेळ मिळतो यांना या अशा गोष्टींसाठी अशी टीका टिप्पणी होऊच शकते…
पालकांच्या रोजच्या वागण्यातून असो, की रोजच्या जगण्यात ब्रेक म्हणून साजरे केलेले सण, त्यात स्त्रीवादला मिळालेली काहीशी विचित्र दिशा या सगळ्यातून मुलं नेमकी काय शिकणार…
अहो मुलांच्या विचारला फ्लेक्सिबिलिटी आणण गरजेचं आहे… काळानुसार जे बदलत चाललंय ते जरी असलं तरी नथ आणि पैठणी फक्त फॅशन होऊ नये ही आपलीच जाबाबदरी असते… या दोन्हीचा संगम मुलांना पाहायला मिळाला तर पुढे घडणारी पिढी सुशील आणि सुसंस्कृत असेल…
कसं आहे ना आपण पालक मुलांसाठीचा सगळ्यात पहिला सोर्स असतो अगदी प्रत्येक गोष्टींसाठीचा, मग बघा ना थोडा अभ्यास करून संस्कृतीचा, सणांचा,आणि मग घ्या त्याचा अनुभव… अहो मनाला मिळणारी शांतता, स्थिरता, उत्साह, कॉसमिक पॉवरशी निर्माण होणारा कनेक्ट हे सगळं पदरी पडेल… अर्थात एकच दिवस तूप खाऊन रूप दिसत नाही हेदेखील लक्षात असू द्यावं…
मंडळी जस घरगुती औषधांना आपण आज्जीचा बटवा म्हणतो तसंच आज्जीचा हा सुद्धा बटवा उघडुयात का? बघा मग ही घडणारी मुलं आपल्या देशाची संस्कृती जपण्यासाठी उत्सुक आणि प्रेरित असतील…